चित्रकारिता - एक न संपणारा प्रवास

मी चित्रं काढायला कधी सुरवात केली हे नेमकं आठवत नाही. सगळ्याच मुलांप्रमाणे मी पण लहानपणी चित्रं काढत होतो, पण अगदी लक्षात राहण्यासारखा एक प्रसंग मी आमच्या बेळगावला तिसरीच्या वर्गात असताना घडला. मी पाटीवर रेल्वेच्या डब्याचं चित्र काढून त्याचं दार उघडं आहे असं दाखवलं होतं. तर आमच्या कुलकर्णी बाईंना ते इतकं आवडलं की त्यांनी ते संपूर्ण शाळेत दाखवून आणलं...! त्या दिवशी मला खूप आनंद झाला आणि कदाचित त्यामुळेच माझी चित्रकलेची आवड आणखीनच वाढली. पुढे मी चित्रकलेत अनेक बक्षिसं मिळवली, त्यामुळे माझी आई, ती पण उत्तम चित्र काढायची, तिने माझ्या पुढील शिक्षणासाठी पुण्यात अभिनव कला विद्यालयात मला पाठवले.

तसा त्या वेळी प्रचलित असलेल्या कमर्शियल आर्टचा पाच वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करून मी १९७९ साली पुन्हा बेळगावला येऊन ग्राफिक डिझाईनचा व्यवसाय थाटला आणि लवकरच त्यामधे पूर्ण गुरफटून गेलो. पाहता पाहता वीस वर्षे कशी गेली हे कळलंच नाही. काळ बदलला होता. आता सुरवातीला जशी प्रत्येक गोष्ट हाताने करायला लागायची..... म्हणजे अगदी इंपोर्टेड रद्दीच्या कागदावरील एक एक अक्षर कट-पेस्ट म्हणजे चक्क छोटी कात्री, चिमटा, रबर सोल्युशन वगैरे वापरून एकेक शब्द तयार करायचा, डार्क रूममध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह वगैरे करायची इत्यादी. पण २००० सालापर्यंत हे सर्व इतिहासजमा झालं होतं आणि सगळं व्हर्चुअल म्हणजे डिजिटल, सॉफ्ट कॉपी असं त्याचं स्वरूप झालं होतं. आणि गल्लोगल्ली DTP म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंगची दुकानं सुरू झाली. गंमत म्हणजे कोणीही, एखादा टायपिस्ट जो संगणक वापरू शकतो तो देखील पेज डिझाईनचा धंदा करायला लागला.

मग मात्र मी ठरवलं की आता आपली काही गरज उरली नाही. मी खूप विचार केला, आयुष्याची चाळीस वर्षे संपली, आता पुढे काय करायचं? मग मी एक यादीच तयार केली मी काय काय करू शकतो याची. त्यामध्ये न लाजता सगळ्या गोष्टी लिहिल्या. अगदी शाळेत मुलांना घेऊन जाणार्‍या ड्रायव्हर पासून शिवणकाम, शिकवणी, खाद्यपदार्थ वगैरे वगैरे. या वेळी बेळगावच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी माझी पेज डिझाईन कन्सल्टन्सीही चालू होती. आणि मी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा माझे तैलरंग आणि जलरंगातील प्रयोग केले. पण पंधरा वर्षांहून अधिक काळ हाताने चित्रकला बंद असल्याने मला अपेक्षित गती मिळाली नाही.

एकेदिवशी माझ्याकडे असलेल्या चार रंगी बॉलपेनने एक चित्र तयार केलं आणि काय आश्चर्य..... माझ्यासकट घरचे सगळे जण खूष म्हणजे अवाक् झाले!!! मला त्या दिवशी काहीतरी वेगळं गवसल्याचं जाणवलं आणि एक अनोखा आनंदही झाला. मग मी बॉलपेनने आणखी तीन चार चित्रं तयार करून पुण्यातल्या माझ्या सरांना आणि काही कलाकार मित्रांना दाखवली. सगळे जण म्हणाले की असं बॉलपेनचं काम पहिल्यांदा पाहतोय. मला वाटलं की जरी सगळ्यांना आश्चर्य वाटले तरी जग खूप मोठं आहे... अनेकांनी असे प्रयोग केले असतील. मग मी इंटरनेटवर शोध घेतला असता कळलं की अनेक कलाकार बॉलपेन वापरून चित्र निर्मिती करतात पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे आणि मला हे ही लक्षात आलं माझं कामही जागतिक दर्जाचं आहे...! आणि मग २००९ साली वयाच्या ५० व्या वर्षी माझं १००% बॉलपेन वापरून केलेल्या चित्रकृतींचं पहिलं प्रदर्शन पुण्यात दर्पण कलादालनात भरवलं गेलं. त्यावेळी पुणेकर चित्र रसिकांनी भरभरून दिलेली दाद माझ्या पुढील प्रवासासाठी मोठी शिदोरी ठरली.

गेल्या दहा वर्षांत अनेक प्रदर्शनं झाली, तसेच माझी कला मी अनेक कार्यशाळा घेऊन खूप जणांना शिकवली. मी तयार केलेली बहुतेक चित्रं जगातील अनेक चित्ररसिकांकडे पोचली. अनेक ठिकाणी माझ्या कामाबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली. पण तरी मला वाटतं की अजून आपल्याला कितीतरी शिकायचंय. प्रत्येक नवं चित्र एक नवीन अनुभव असतो. मला वाटतं की हा प्रवास न संपणारा आहे. एका नव्या चित्राची सुरुवात ही एखाद्या उत्स्फूर्त संकल्पनेपासून होते. मग कदाचित थोडं प्लॅनिंग आणि मग एक अनामिक ओढ प्रत्यक्ष चित्रनिर्मितीची....... आणि ही प्रक्रिया चालू असताना आपलं अस्तित्व नगण्यच असतं.... असा किती वेळ जातो कोण जाणे. रोज थोडा थोडा वेळ करत कधी ४-५ तास तर बहुतेक वेळा २०-४० तासापर्यंत.... आणि मग अचानक यातून जाग येते आत्यंतिक अशा आनंदाच्या उर्मींनी.... कि ते चित्र मला सांगायला लागलंय की आता झालं तुझं काम..... हा पहा मी जन्म घेतलाय...! आणि माझा असा अनुभव आहे की चित्र निर्मितीचा मला जितका जास्त आनंद तेवढंच ते चित्र जास्तीत जास्त रसिकांना आवडतं. मला वाटतं की चित्रकार स्वतः च्या हृदयाचा एक तुकडाच त्या चित्रात घालत असतो पण त्यामुळे त्याच्या हृदयाचा आकार कमी व्हायच्या ऐवजी उलट वाढतोच. आणि खरच माझा अनुभव आहे की बहुतेक सर्व चित्रकार अतिशय दिलदार आणि प्रेमळ असतात ते कदाचित यामुळेच... पहा प्रिय वाचक हो जगात सगळेजण कलाकार झाले तर जग किती सुंदर होईल?

शिरीष देशपांडे

Comments

Popular posts from this blog

The great lockdown of 2020

Book Review by Viveca