पुस्तक परिक्षण - एक्सप्लोरिंग द बॉलपॉइंट

एक्सप्लोरिंग द बॉलपॉइंट

लेखक : चित्रकार शिरीष देशपांडे


कलाक्षेत्रातील हे पुस्तक परिक्षणासाठी मी हातात घेतले आणि याचे वाचन करता करता मी या पुस्तकातील एका कलाकाराच्या दृष्टिने उपलब्ध ज्ञान भंडाराने प्रभावित झाले. प्रस्तुत पुस्तक चित्रकलेवरील एक अत्यंत सुंदर व अतिशय उपयोगी असे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक श्री शिरीष देशपांडे स्वत: एक प्रथितयश चित्रकार आहेत. या क्षेत्रातील जवळपास ४० वर्षांचा त्यांचा अनुभव

आणि अनन्यसाधारण कामगिरी यामुळे हे पुस्तक अतिशय प्रभावी ठरते. बेळगाव स्थित चित्रकार शिरीष देशपांडे यांनी कला क्षेत्रातील आपले कमर्शियल आर्ट (व्यावसायिक कला)चे महाविद्यालयिन शिक्षण पुणे येथिल अभिनव कला महाविद्यालयातून पूर्ण केले. जवळपास ३ दशके शिरीषजींनी स्वगावी बेळगावातच एक यशस्वी ग्राफिक डिझायनर म्हणून या क्षेत्रात कार्य केले. त्यांच्या या

क्षेत्रातील दर्जेदार कार्याची चुणुक आपल्याला त्यांनी स्वत: डिझाईन केलेल्या याच पुस्तकाच्या मुखपृष्ठाने दिसून येते. या क्षेत्रांत काम केल्यानंतर कलाभिव्यक्ति च्या वेगळ्या वाटेवर मार्गक्रमण करण्यास ते उद्युक्त झाले, व त्यांनी (Fine Art)चित्रकलेत आपली वाटचाल सुरु केली व त्यानंतर चित्रकलेला त्यांच्या कला प्रवासात महत्वाचे स्थान मिळाले. चित्रसाधना करताना त्यांनी चित्रकलेत प्रचलित अशी जलरंग, तैलरंग, ऍक्रिलिक्स अशी निरनिराळी माध्यमं हाताळली. परंतु बॉलपेन या माध्यमाने त्यांना आकर्षित केले व त्यांना ते विशेष भावले ही. या माध्यमात चित्रं रंगवताना अनेक आव्हानं त्यांच्या समोर आली पण ती आव्हानं शिरीष जींनी आनंदाने स्विकारली व त्यावर मात करत एक से एक सरस चित्रांची निर्मिती केली. या नव्या माध्यमाची, यातील शास्त्र शुद्ध माहिती देण्यासाठी ते कार्यशाळा घेतात आणी अतिशय सोप्या पद्धतीने या माध्यमाचा चित्रकलेसाठी वापर करायला शिकवतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बॉलपेन या माध्यमाला भारतात चित्रनिर्मिती च्या माध्यमाचा दर्जा मिळाला असे म्हणायला हरकत नाही कारण यापूर्वी या माध्यमाविषयी भारतीय कलाक्षेत्रांत अनभिज्ञता होती.


पुस्तक : एक्सप्लोरिंग द बॉलपॉइंट

चित्रकार शिरीष देशपांडे यांचं हे चित्रकलेच्या दृष्टिने बहुपयोगी असे पुस्तक आहे...या पुस्तकात त्यांच्या अप्रतिम चित्रांचे अनेक फोटो आहेत जे पाहिल्यावर ती चित्र, तैल चित्र वा acrylic चित्र नसून ती बॉलपेन वापरून केलेली आहेत यावर विश्वासच बसत नाही. स्टिल लाईफ, निसर्ग चित्रं, व्यक्तिचित्रं, कॉंम्पोझिशन्स असे सर्वच प्रकार शिरीषजींनी या माध्यमात हाताळले आहेत. त्यांच्या चित्रकलेचे माध्यम बॉलपेन, जे चित्रनिर्मिती साठी फारसे वापरले न गेलेले असे माध्यम आहे आणि हे माध्यम वापरून केलेली त्यांची अद्भुत चित्रं कलाक्षेत्रांत अतिशय कुतूहल निर्माण करणारी ठरतात. या माध्यमातील शिरीषजींची अतिशय सुंदर चित्रे पाहिल्यावर एका कलाकाराच्या मनात साहजिकच अनेक प्रश्न उद्भवतात, आणि कमालीचे कुतूहल निर्माण होते. केवळ लिखाणासाठी निर्मित असे बॉलपेन, ज्यात ना पेंसिलीचे गुण आहेत ना कुंचल्याचे, अशा माध्यमात चित्रनिर्मिती? ते कसे शक्य आहे? आणि रंगांचे मिश्रण...ते ही शक्य आहे ? आणि असेच कितीतरी प्रश्न सर्वसाधारणपणे कुणाच्याही मनात येऊ शकतात….त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं पुस्तकात आपल्याला शिरीषजींनी दिली आहेत व तीही अतिशय रोचक अशा शैलीत, सर्वांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत.. हे पुस्तक एका चित्रकाराचे मनोगत नसून ते एका अशा प्रगल्भ चित्रकाराचे भाष्य आहे, ज्याने बॉलपेन या माध्यमाचा सखोल अभ्यास करून या माध्यमाचा प्रयोग करण्या बाबतचे शास्त्र शुद्ध ज्ञान कला जगतास पुस्तक रुपाने बहाल केले आहे. आणि एका नव्या , वेगळ्या माध्यमाची जगाला ओळख करून दिली आहे.

१९४० साली बॉलपेन अस्तित्वात आले पण चित्रकलेसाठी याचा माध्यम म्हणून वापर व्हायला ४ दशकं जावी लागली….असे लेखक नमूद करतात… तैलरंग व जलरंग हीच माध्यमं चित्रकलेसाठी वापरण्याचा पूर्वापार प्रघात होता...बॉलपेन चा विकास, लेखन व फार फार तर रेखाटन या करता झाला. शाई व दौत यापासून सुटका हाच मुख्यत्वे याचा हेतू असावा. परंतु रंगीत बॉलपेन येताच चित्रकलेसाठी या माध्यमाचा विचार सुरु झाला असावा.

या क्षेत्रात अनेक देशी विदेशी कलाकारांनी अनेक प्रयोग केले तेव्हा कुठे हे शक्य झाले...आणि जे काही साध्य झाले ते विस्मित करणारे आहे. स्वत: शिरीष जींची बॉलपेन चित्रे अचम्भित करणारी आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी चित्रकलेकडे वळलेल्या शिरीषजींनी इतर कोणतीही माध्यमं न वापरता, बॉलपेन चा प्रयोग चित्र निर्मितीसाठी करायचे ठरवले. प्रचलित माध्यमाहून काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने त्यांना प्रेरित केलं..आणि अनेक प्रयोगानंतर त्यांनी स्वत: खास असं तंत्र विकसित केलं. आणि ते तंत्र त्यांनी आपल्या स्वत:पुरतं न ठेवता जगासाठी खुलं केलं. म्हणूनच हे ज्ञान केवळ मराठी भाषिकांकरता मर्यादित न ठेवता इंग्रजी भाषेतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. इंग्रजी भाषेत असलेले हे पुस्तक अतिशय सरल शब्दात शिरीषजींनी आपल्यासमोर आणले आहे. पुस्तक लिहिण्यापूर्वीपासूनच ते या विषयावर विशेष कार्यशाळा घेत असत. त्यामुळे या माध्यमाच्या अध्यापनाचा त्यांना अनुभव मिळाला व विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न त्यांना जाणून घेता आले.

३ दिवसीय या कार्यशाळांतून मुख्यत्वे ते ३ गोष्टींचा समावेश करतात.

१. चित्र रेखाटनाचे मूलभूत तत्व

२. रेखाटनाच्या तंत्राचे प्रात्यक्षिक

३. बॉलपेन ची विस्तृत माहिती

त्यांच्या या कार्यशाळेतून विद्यार्थ्याना या तंत्राविषयी जे काही शिकायला मिळते तेच सर्व या पुस्तकातून मांडलेले आपल्याला दिसून येते, आणि म्हणूनच ते अतिशय प्रभावी ठरते. या पुस्तकाच्या ऋणनिर्देश विभागात लेखकाने आपले आईवडिल, कलामहाविद्यालयातील शिक्षक, गुरु, त्यांचे आप्त स्वकीय, कलाप्रेमी व विद्यार्थ्याचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांना हे पुस्तक लिहिण्यास प्रेरित करणारे श्री रोनाल्ड बेल व ओरलॅंडो लेबरॉन यांचे विषयी ते कृतज्ञता व्यक्त करतात, ज्यांच्या सहकार्याने हे पुस्तक अस्तित्वात आणणे शक्य झाले.


लेखकाने ४ विभागातून या अद्बुत माध्यमा बाबतची सर्व माहिती या पुस्तकात दिली आहे. ते विभाग असे…

विभाग क्रमांक १

1. बॉलपॉइंट पेन

बॉलपेन या वस्तूची रचना व वैशिष्ट्य, निर्मिती मागचा हेतू, अन्य पेनांशी तुलना, त्याची घाटणी, प्रकारातले वैविध्य ,रंगाची उपलब्धी आणि अर्थातच वापरण्याची पद्धत…. अशी सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आहे.

२. बॉलपॉइंट पेन, पेंसिल वा शाई चे पेन

या शिवाय आधी उल्लेखिलेल्या चित्र रेखाटना करता वापरल्या जाणार्या तिनही प्रकारांची वैशिष्ट्ये, त्यामुळे साधले जाऊ शकणारे परिणाम व बॉलपेन या माध्यमाशी त्यांची तुलना ही प्रभावी रित्या मांडली आहे.

3. बॉलपॉइंट पेन, गुण , दोष

एव्हढेच नव्हे तर लेखक चित्रकलेच्या ईतर कोणत्याही माध्यमांच्या तुलनेत बॉलपेन च्या वौशिष्ट्यां विषयी माहिती देत आहे.

4. बॉलपेन च्या शाई चे परिक्षण 

बॉलपेन ची शाई ही कंपनी कंपनीतील निर्मिती प्रक्रियेनुसार वेगवेगळे परिणाम देणारी असते. तेव्हां या शाईचे ती प्रयोगात आणण्या पूर्वी ४ टप्प्यात परिक्षण करुन घेतल्यास दीर्घकाळ टिकणारी चित्र निर्मिती संभवते. या भागात ही अशी तांत्रिक माहिती लेखक महत्वपूर्ण टिप्स सह देतात.


विभाग क्रमांक 2

5. रंग.

रंगांचे प्रकार, शीतल व ऊष्ण याशिवाय रंगांचे पोत, गहिरेपण व एकूणच भडक वा सौम्यपणा ही सर्व माहिती आहे.

6. बॉलपेन च्या शाईतील रंगांची उपलब्धता.

बॉलपेन रंगीत आली तरी त्यांत मोजक्या रंगांची शाई उपलब्ध असते आणि त्या बाबत सर्व माहिती या माध्यमाचा वापर करून चित्र निर्मिती करु ईच्छिणार्या करता इथे दिली आहे.

7. रेखाटन व रंग छटा.

बॉलपेनने चित्र काढताना व त्यातील रेषा व रंगच्छटा दाखवताना वापरायचे वेगळे तंत्र असते. हे तंत्र अवगत करण्या करता ते साध्य करण्यासाठी लेखक सरावाचे छोटे छोटे अभ्यासक्रम करायचा सल्ला देतात.

8. रेषा व रेखांकन.

बॉलपेन वापरताना वेगवेगळे तंत्र अवलंबून, रेषांतील ठळकपणा कमी जास्त केल्याने ते रेखांकन प्रभावी करता येऊ शकते व या विषयी लेखक विस्ताराने सांगतात.

9. पोत व त्याचे वैशिष्ट्य.

रेषेचा हलकेपणा व गहिरेपणा क्रमाक्रमाने पोत बदलतात. पोत निर्मितीचा हा परिणाम साधण्यासाटी लेखक स्वत:च्या चित्रांचे उदाहरण देऊन मौलिक मार्गदर्शन करतात.

10. रंगांचे आवरण व मिश्रण.

कंपनी कंपनी च्या बॉलपेन च्या उत्पादन प्रक्रियेनुसार त्यात वेगवेगळ्या रंगांच्या अनेको छटा पहावयास मिळतात. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी बॉलपेनने रंगांवर रंगांचे थर लावून हवा तो रंग कसा साधावा , याशिवाय तिसराच रंग ही तयार करणे या बद्दल ही लेखक आपल्या चित्राचा फोटो दाखवून विस्ताराने खूपच रोचक पद्धतीने सांगतात..


विभाग क्रमांक ३

11. चित्र पृष्ठ - कागद.

बॉलपेन च्या प्रयोगासाठी पेपर/ कागद हाच योग्य पर्याय आहे. योग्य अशा कागदात आढळणार्या अनेक प्रकारांबद्दल लेखक पुस्तकात माहिती देतात.

12. त्वचेच्या रंगछटा.

व्यक्ती चित्रणात रंगांची सादृष्यता अनिवार्य असते. त्वचेवरील रंगांतले स्वाभाविक बदल टिपण्या साठी मॉडेल च्या चेहर्यावरील बारकावे, त्वचेच्या रंगातील बारिक सारीक बदल टिपून त्याप्रमाणे रंगांची योजना कशी करावी याविषयी लेखक त्यांनी केलेल्या एका सुंदर पोर्ट्रेट चा फोटो उदाहरण देऊन समजाऊन सांगतात.

13. सराव

चित्रनिर्मिती साठी योग्य तंत्र तंत्राचा सतत सराव करत राहणे आवश्यक आहे. सराव कसा करावा याविषयी ही लेखक अतिशय रीतसर पद्धतीचा अवलम्ब करण्याचा आग्रह धरतात.

14. कलानिर्मिती

सरावाला धरुनच कला निर्मिती करताना एकूण परिसर कसा असावा , आवश्यक त्या सर्व साधनांची जुळवा जुळव, मांडणी या सर्व गोष्टींची माहिती लेखकाने दिली आहे.


विभाग क्रमांक ४

15. प्रात्यक्षिक -१ भूमितीय आकारांची संरचनाभूमितीय आकार वापरून चित्र रचना करताना अनुसरावयाचे नियम, अटी याविषयी लेखक खूप रोचक अशी माहिती देतात.

16. प्रात्यक्षिक - २ निसर्ग चित्रण

निसर्ग चित्रणाच्या प्रात्यक्षिकात लेखक जैविक वस्तू व स्मरण चित्रा वर भर देतात. भूमितीय आकारांच्या रचने प्रमाणे निसर्ग चित्रणात कसले ही बंधन नसते व कल्पना विलासाला भरपूर वाव असतो.

17. प्रात्यक्षिक - ३ व्यक्ति चित्रण

रसिकांच्या कधी न संपणार्या मागणीमुळे चित्रकारासाठी व्यक्तिचित्रण हे अर्थार्जनाचे साधन होऊ शकते. लेखक त्यांनी केलेल्या एका दर्जेदार पोर्ट्रेट चा दाखला देउन त्यात त्यानी वेगवेगळ्या भागासाठी ज्या पद्धतीने बॉलपेन चा वापर केला आहे त्याचे प्रात्यक्षिक च देतात. त्या पोर्ट्रेटचे एकेका टप्प्या वरचे फोटो पुस्तकात दिल्याने ही सर्व प्रक्रिया समजणे अतिशय सोपे होउन जाते.

अशा तर्हेने प्रस्तुत पुस्तक हे चित्रकलेसाठी बॉलपेन या माध्यमाच्या विषयी परिपूर्ण अशा माहितीने समृद्ध झालेले आहे. शिरीषजींच्या अनेक उत्तमोत्तम पोर्ट्रेट्स, निसर्ग चित्रं , स्टिललाईफ, कॉंम्पोजिशन्स च्या फोटोंनी हे पुस्तक नटलेले आहे. कलाकारांबरोबरंच कला रसिकांसाठी ही मोठीच पर्वणी आहे. पहिल्या पानापासूनच हे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवते. बॉलपेन चा उपयोग कलानिर्मिती साठी इतका प्रभावी ठरू शकतो हे या पुस्तकात अतिशय यशस्वी रित्या मांडले आहे. प्रत्येक कलारसिकाच्या संग्रही हे पुस्तक असावे असे माझे मत आहे. या मोलाच्या कामगिरी बद्दल शिरीष देशपांडे या गुणी कलाकाराचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या आगामी प्रकल्पां करता त्यांना खूप खूप शुभेच्छा …

तसेच या उत्कृष्ट पुस्तकाच्या परिक्षणा साठी मला निमंत्रित केल्याबद्द्ल मी त्यांची अत्यंत आभारी आहे.


सौ.अल्पना लेले

9011335230

lele.alpana@gmail.com

Comments

Popular posts from this blog

The great lockdown of 2020

"Necessity is the mother of invention"