'गुरु' शब्दात अखिल ब्रम्हांड

 'गुरु' शब्दात अखिल ब्रम्हांड


गुरू या एका शब्दात अखिल ब्रम्हांड सामावलेले आहे. आध्यात्मिक परंपरेमधे स्वयंप्रगतीसाठी जशी गुरुची आवश्यकता असते तशीच कोणतीही कला आणि कोणतेही तंत्रज्ञान मिळवण्यासाठी गुरूला पर्याय नाही. एखादी गोष्ट किंवा कृती जो आपल्याला शिकवतो तो शिक्षक, पण जो आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचे काम करतो तो गुरू.

तसं पाहिलं तर आपल्या मानवी जीवनात अगदी बालपणापासून जवळपास सर्वच गोष्टी आपल्याला पहिल्यापासून शिकायला लागतात. बहुतेक वेळा आपण दुसर्‍यांचे पाहून शिकतो. लहानपणी भिंतीवर किंवा जमिनीवर मिळेल त्या गोष्टीने रेघोट्या ओढून आपल्या भावना व्यक्त करतो त्यामागे मात्र केवळ नैसर्गिक स्वयंस्फूर्ती असते असे मला वाटते. बहुतेक वेळा पालक मुलांना काय भिंत घाण केली आहे म्हणून ओरडतात. पण काही सूज्ञ पालक मुलांच्या या प्रकारे व्यक्त होण्याला प्रोत्साहन देतात ते पालक एका अर्थाने मुलांचे चित्रकलेचे पहिले गुरू.

चित्रकला ही देखील नृत्य आणि गायन या प्रमाणेच माणसाला उपजत आहे. या सर्व कलांचे शास्त्रीय ज्ञान आज सगळीकडे उपलब्ध आहे. २१ व्या शतकातील गूगल आणि यूट्युब यांना सुद्धा आपण मोठे शिक्षक म्हणुन संबोधले तर काही गैर नाही. तीसेक वर्षांपूर्वी पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती मिळवणं अत्यंत कष्टप्रद आणि कठीण होतं. पण आता या इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची माहिती अगदी काही क्षणातच बसल्या जागी आपल्याला मिळते. आता खरा प्रश्न आहे तो मिळालेल्या एवढ्या प्रचंड माहितीचं आपण करायचं काय?

कोणतीही कला मानवी जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देते. पण उपजत असलेल्या कलेची उपासना केल्याशिवाय ती आपल्याला प्रसन्न होत नाही. इथे उपासना म्हणजे अभ्यास, सराव, प्रयोग तसेच प्रामाणिक प्रयत्न, चिंतन, मनन हे सगळं आलं. चित्रकला शिकण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

पण त्या शिवाय चित्र काढण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. कागद, कॅनव्हास, क्रेयॉन, जलरंगांपासून तैलरंगांपर्यंत अनेक प्रकारची माध्यमं आज उपलब्ध आहेत. या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे वापरतात ते देखिल तुम्हाला यूट्युबवर पहायला मिळेल. आपल्या कुवतीनुसार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर घरी बसून सगळे प्रयोग आपण करून पाहू शकतो. आता एवढं सगळं जर का शक्य असेल तर शिक्षकांची गरज काय असं वाटणं स्वाभाविक आहे.

पण मूळात चित्रकला ही एक प्रकारची भाषा आहे. चित्रकलेचे स्वतःचे असे एक व्याकरण आणि नियम आहेत. पण तरीही प्रत्येक चित्रकाराची भाषा वेगळी आणि स्वतंत्र असते. चित्रकार चित्रातून त्याच्या भावना किंवा विचार व्यक्त करतो. हे साध्य करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टीवर त्याला प्रभुत्व मिळवावे लागते. एक म्हणजे माध्यमावर आणि दुसरे म्हणजे चित्र विषयावर. आणि इथे त्या गुरूची आवश्यकता असते. माध्यम कसे वापरले जाते हे शिक्षण त्याला कोणीही शिक्षक किंवा अगदी यूट्युब सुध्दा शिकवू शकतात. पण ते माध्यम वापरून तो स्वतःची ओळख कशी निर्माण करू शकतो हे फक्त एक गुरूच सांगू शकेल.

चित्र निर्मितीचा प्रवास हा अत्यंत सुंदर आणि रोमांचकारी अनुभव आहे. प्रत्येक चित्र हा एक वेगळा प्रवास असतो. यात दिशाहीन भरकटणं हा अनुभव अनेकांना येतो. माध्यम तंत्रात अडकून पडलेले आणि चित्र विषयाची आजिबात जाण नसल्याने कोणत्याही चालू विषयाची चित्र काढून पोट चालवत असलेले अनेक आहेत.

एक प्रतिभावंत चित्रकार होण्यासाठी फक्त चित्र माध्यमावर प्रभुत्व असून चालत नाही तर त्या बरोबरच मानवी जीवन, निसर्ग आणि अज्ञाताचा ध्यास, या सर्व गोष्टींचे चिंतन आणि मनन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सर्व काही शक्य होण्यासाठी एक योग्य तो गुरू मिळणे अवघड आहे पण मला वाटते आपण सगळ्यांकडून चांगलं आहे ते घ्यायला काय हरकत आहे. फक्त योग्य आणि अयोग्य काय याची व्याख्या आपल्या अनुभवातून ठरवावी.

स्वानुभव हा सर्वात मोठा गुरू आहे. पण आपण स्वतः अनुभव घेतला आणि त्यातून शिकलो तरच ते खरं आहे. तेव्हा, गुरू या ना त्या प्रकारे अनिवार्य आहे. गुरू पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा.

शिरीष देशपांडे
......................
गुरुपौर्णिमेच्या पुरवणीमधे बेळगाव येथील दैनिक तरुण भारत मधे २३ जुलै २०२१ ला प्रकाशित झालेला लेख.

Comments

Popular posts from this blog

The great lockdown of 2020

"Necessity is the mother of invention"