"कलेतील दृश्य आणि अदृश्य गोष्टींबद्दल"

 प्रत्येक चित्र म्हणजे डोळ्यांना दिसणारा एक दृश्यमान थर असतो. हा थर म्हणजे कलाकाराने रेखाटलेले किंवा रंगवलेले आपल्या डोळ्यांना दिसणारे चित्र घटक असतात.


आणखी एक अदृश्य स्तर जो चित्रामधील विविध कलात्मक घटकांच्या परस्पर तार्किक संबंधांबद्दल असतो. जर चित्र सौंदर्यशास्त्राच्या मूलभूत नियमांचे पालन करत असेल, तर दर्शक निरीक्षण करण्यासाठी सहजच अधिक वेळ देतात. या ठिकाणी पाहणारे समाधानी असतील तर ते म्हणतात की कलाकृती चांगली आहे.

मग आणखी एक अदृश्य स्तर जो रंग, छाया प्रकाश आणि विषय यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल असतो. हा स्तर भावनिक प्रतिसाद निर्माण करणारा असतो जो प्रत्येक दर्शकाचा त्या कलाकृतीशी वैयक्तिक बंध निर्माण करतो. तसे करण्यात कलाकृती यशस्वी झाली, तर प्रतिसाद 'वाह' असा असतो.

आणि मग आणखी एक महत्त्वाचा 'स्मृती' स्तर असतो, जो शेवटी चित्रदर्शनानुभव मनात रेंगाळत राहतो, एक 'आफ्टर-इमेज' म्हणून दर्शकांच्या आठवणींमध्ये राहतो. मानवी स्मृती खूप गुंतागुंतीच्या असतात आणि निर्णय घेण्यात त्या खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आवडी आणि नापसंती निर्माण करतात आणि त्याच आपल्या सर्व इच्छांचे स्रोतही असतात.

शेवटी, जेव्हा वरील सर्व गोष्टी जुळून येतात, म्हणजे जेव्हा एखादा दर्शक त्याच्या मनात योग्य भावनिक प्रतिसाद निर्माण करणारी कलाकृती पाहतो, आणि त्याच वेळी काही आठवणींना उजाळा देतो..... तेव्हा कलाकृती विकली जाते. तो तिच्या सर्व दोषांसह आणि सर्व सौंदर्यासह त्या कलाकृतीला "आपलं" करतो. ही काही छोटी गोष्ट नाही. कलाकार, दर्शक आणि कलाकृती यांच्या आयुष्यातील हा एक अनोखा प्रसंग असतो.

अर्थात, अपवाद असतात आणि इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात.

- शिरीष देशपांडे

Comments

Popular posts from this blog

The great lockdown of 2020

"Necessity is the mother of invention"